Ad will apear here
Next
‘कथक’वैभव


नृत्यगुरू रोहिणीताई भाटे यांचा स्मृतिदिन १० ऑक्टोबर रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने, प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख... 
......
१९८६ च्या जून महिन्यातली बारा तारीख. स्थळ बालगंधर्व रंगमंदिराचे कलादालन. दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच १३ जून १९८६पासून ते १६ जून १९८६पर्यंतच्या काळात माझे पहिलेच स्वतंत्र प्रकाशचित्र प्रदर्शन. प्रदर्शनाचे नाव ‘स्वरचित्रांच्या काठावरती...’ अर्थातच भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या मी टिपलेल्या भावमुद्रांचे सादरीकरण. उद्घाटनाचा कार्यक्रमही प्रदर्शनाच्या विषयाला साजेसा. माझा मित्र विजय कोपरकर याचं गाणं, साथीला दुसरा मित्र रामदास पळसुले आणि नुकतेच पुण्याला परिचित झालेले सतारवादक शाहीद परवेझ यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन. गद्य भाषणाला पूर्णपणे चाट. अशा प्रकारे प्रदर्शनाचे उद्घाटन होण्याची ‘बालगंधर्व’मधील ही पहिलीच वेळ.

कलादालन रसिकांच्या उपस्थितीने पूर्ण भरून गेलेले. कलादालनाच्या चार भिंतींवर अभिजात संगीतातील मोगुबाई कुर्डीकर, भीमसेनजी, कुमारजी, अभिषेकीबुवा, किशोरीताई, रविशंकर, विलायत खाँ, अमजदअली खाँ, झाकीर हुसैन अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भावमुद्रा अन् विजयच्या सुरेल स्वरांचा दरवळ. मैफल एकदम जमून गेली. भारतीय बैठकीवर बसलेले रसिक. त्यातील काही जणांना मी ओळखत होतो; पण त्यात उंच, गोरीपान, अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची असलेली एक व्यक्ती उस्ताद सईदउद्दिन डागर यांच्या शेजारी बसलेली. पाहताक्षणीच ही व्यक्ती वेगळी आणि खास आहे याची खूण पटत होती. मैफल संपली. रसिक प्रदर्शित प्रकाशचित्रे पाहण्यात रंगले. ती व्यक्ती उस्ताद सईदउद्दिन डागर यांच्याशी बातचीत करीत होती. मी त्या दोघांच्याजवळ गेलो. नमस्कार केला. डागर गुरुजींनी माझं कौतुक केलं, माझी पाठ थोपटली. त्या व्यक्तीने आपणहून स्वतःची ओळख करून दिली. ‘नमस्कार, मी रोहिणी भाटे.’ इतक्या मोठ्या कलाकार, इतक्या मोठ्या गुरू अन् इतका साधेपणा. मी त्यांचं नाव ऐकलं होतं; पण त्यांना भेटण्याचा योग आला नव्हता. तो असा अचानक येईल असं वाटलंही नव्हतं. त्यामुळे मी अवाक झालो होतो. मी त्या धक्क्यात असतानाच त्यांनी माझं भरपूर कौतुक केलं. परत एकदा हिंडून त्यांनी प्रदर्शन बघितलं. आणि अभिप्राय लिहिला - ‘फार सुंदर असं हे प्रदर्शन मनाला स्मृतिविश्वात घेऊन गेलं. तिथून परतले ती या कलावंतांच्या स्मृतिगंधाचा दरवळ बरोबर घेऊनच. सतीश यांचे आम्हा सर्वांवर फार फार उपकार आहेत - या प्रदर्शनाद्वारे थोर कलावंतांचे ‘भाव’ साक्षात प्रकाशचित्रात पकडून ठेवल्यानं!’ इतक्या मोठ्या कलावतीकडून लिहिला गेलेला अभिप्राय माझ्यालेखी फक्त कौतुकच नव्हतं, तर एक मौलिक आशीर्वादच होता.

माझ्या छंदाबरोबरच मी औद्योगिक प्रकाशचित्रणात व्यग्र झालो. कधी कधी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रोहिणीताई भेटत. ‘नवीन काय करताय?’ हा त्यांचा प्रश्न ठरलेला असे. ‘नृत्यं गीतं तथा वाद्यं त्रयं संगीतमुच्यते’ अशी संगीतशास्त्राची व्याख्या केली असली, तरी माझा ओढा हा गायक-वादकांच्या भावमुद्रांकडे असल्याने मी नृत्याचे प्रकाशचित्रण करीत नसे. मी नवीन कोणाचे फोटो काढले हे त्यांना अशा वेळी सांगत असे. मी चांगले संगीत ऐकतो व त्याबरोबरच त्या कलाकारांचे फोटोही काढतो याबद्दल त्या प्रत्येक वेळी माझं कौतुक करीत.

त्यातच एकदा मला एका नर्तिकेकडून तिच्या ‘फोटोसेशन’विषयी विचारणा झाली. तिला अनेक नृत्यमुद्रा असलेले व वेगवेगळ्या रंगांच्या नृत्य-पोषाखात तिचे फोटो काढून हवे होते. मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. वेळ व तारीख ठरली. ठरलेल्या दिवशी ती नर्तिका व तिच्या दोन मैत्रिणी माझ्या स्टुडिओत पोहोचल्या. मेकअप आर्टिस्टही आले. फोटोसेशनसाठी काय प्रकारचा मेकअप हवा आहे हे मी त्यांना सांगितलं. मी माझे स्टुडिओ लाइट्स व पार्श्वभूमीच्या तयारीला लागलो. यात तासभर गेला. आधी ठरल्याप्रमाणे कोणकोणत्या नृत्यमुद्रा घ्यायच्या आहेत, यावर त्या नर्तिकेने बराच अभ्यासही केला होता; पण ती शरीरमुद्रा, तो भाव अगदी अचूक आहे का नाही हे कोणी तरी तज्ञ्ी व्यक्तीने सांगणं गरजेचं होतं. कारण मला त्यातलं ओ का ठो माहीत नव्हते. म्हणून मी त्या नर्तिकेला त्याबद्दल बोललो. त्यावर ती म्हणाली, ‘माझ्या गुरू बेबीताई स्वतःच येणार आहेत. येतीलच त्या इतक्यात.’ आमची सर्व तयारी होत असतानाच त्या गुरू आल्या आणि परत एकदा मी आश्चर्यचकित! कारण बेबीताई म्हणजे दुसरं कोणी नसून स्वतः रोहिणीताई भाटेच होत्या. त्यांच्या सर्वच लहान-मोठ्या शिष्या त्यांना बेबीताई म्हणतात हे मला कुठे माहीत असणार? आम्ही त्यांना नमस्कार करून फोटोसेशनला सुरुवात केली. रंगीत व कृष्ण-धवल अशा दोन्ही फिल्मवर मी दोन कॅमेऱ्यांनी फोटो काढत होतो. मी जेथून फोटो टिपत होतो त्याच्या बरोबर मागे एका खुर्चीत एकदम ताठ कण्याने बसलेल्या रोहिणीताई सूचना करीत होत्या. प्रत्येक फ्रेमगणिक, प्रत्येक नृत्यमुद्रेला त्या स्वतः अचूक करीत होत्या. कधी अचूक असलेली मुद्रा मी दोन्ही फोटो टिपेपर्यंत बदले; पण त्यांचे इतके बारकाईने लक्ष असे, की त्या लगेच थांबवत. ‘हो, फिल्मचा तो तुकडाही उगाच वाया जायला नको.’ हे त्यांचं त्यावरचं आग्रही म्हणणं. अचूकतेचा असा ध्यास असणाऱ्या व्यक्तीबरोबर काम करणं ही आपल्यात सुधारणा करून घेण्याची अनोखी संधीच असते. पुढच्या काळात त्यांच्या जवळजवळ सर्वच शिष्यांचं फोटोसेशन मी केलं. प्रत्येक वेळी त्या येत. त्यांचा तो उत्साह अन् अचूकतेचा ध्यास कणभरही कमी नव्हता. त्यांच्या नुसत्या उपस्थितीने स्टुडिओत उत्साहाचं व चैतन्याचं वातावरण निर्माण होई.

दरम्यानच्या काळात मी त्यांच्या ‘नृत्यभारती’ या संस्थेच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहू लागलो. रोहिणीताईंनी संरचना केलेल्या ‘मौन’, ‘कठपुतली’, ‘होरी’, ‘तन्मात्र’, ‘रूपकथक’, ‘नृत्तविशेष’ अशा अनेक कार्यक्रमांचं प्रकाशचित्रण मला करता आलं. त्या वेळी त्यांच्या स्टेजवरील सादरीकरणाचा अनुभव घेता आला. तो दृश्य अनुभव म्हणजे एवढ्या मोठ्या स्टेजचा व त्यामागील भव्य अवकाशाचा अप्रतिम वापर करत दृश्यात्म व काव्यात्म असा नृत्यरचनेच्या अनोख्या आविष्काराचा अनुभव! चित्रकलेत, शिल्पकलेत, वास्तुकलेत व प्रकाशचित्रणातही अवकाशाचं अनन्य महत्त्व आहेच; पण नृत्यकलेत तर अवकाशाचं भान हा स्थायीभाव आहे. रोहिणीताईंचं हे भान व नर्तनातील अप्रतिम कौशल्य, तादात्म्य, नृत्यकलेच्या रूपसौंदर्याची त्यांची मांडणी व त्यातील सहजता हे तज्ज्ञांप्रमाणेच अज्ञांनाही विस्मित करायला लावील असंच असे.

एकदा अशाच सुरू असलेल्या फोटोसेशनमध्ये मी त्यांचाच फोटोसेशन करण्याविषयी त्यांना विचारलं. त्यांची ज्येष्ठ, संवेदनशील व आवडती शिष्या नीलिमा अध्येने माझं म्हणणं लगेच उचलून धरलं. खास फोटोसेशनमध्ये अशी काढलेली त्यांची प्रकाशचित्रं उपलब्ध नव्हतीच. होती ती त्यांची स्टेजवर सादरीकरण करताना असलेली प्रकाशचित्रं. याचं कारण त्या स्वतःचा फोटोसेशन करण्यास अनिच्छुक असत; पण मग खूपच आग्रह झाल्यानंतर मात्र त्यांनी होकार दिला. २५ मार्च १९९३ रोजी माझ्या स्टुडिओत जणू सारी ‘नृत्यभारती’ अवतरली होती. दोन वेगळ्या रंगाचे नृत्य-पोषाख घेऊन बेबीताई (हो, नंतर मीपण त्यांना त्यांच्या शिष्यांप्रमाणे बेबीताई म्हणायला लागलो) आल्या. तिथून पुढचे पाच-सहा तास माझ्या स्टुडिओने कथकचे सर्व विभ्रम अनुभवले. त्या दिवशी ‘रोहिणी भाटे’ या असामान्य अशा कलावंताचा एकमेव असा पहिलाच दीर्घ फोटोसेशन पार पडला. आधीच्या नर्तिकांच्या फोटोसेशनच्या वेळी बेबीताईंच्या तोंडून ‘नृत्त’ व ‘नृत्य’ यातला फरक ऐकला होता, कळायला लागला होता. त्याचं आज प्रत्यक्ष सादरीकरण होतं. अथक रियाजातून त्यांना स्वतःच्या मनाच्या दर्पणात जाणीवपूर्वक स्वतःचं प्रतिबिंब पाहण्याची सिद्धी प्राप्त झाली असणार. त्यामुळेच कदाचित त्यांची प्रत्येक हालचाल व मुद्रा ही अचूकच उमलून येत होती. माझं काम सोपं झालं होतं. सगळ्या फिल्म्स प्रोसेस झाल्या. ‘फिल्मचा एकही तुकडा वाया गेला नव्हता.’ प्रिंट्स आल्यावर मी ‘नृत्यभारती’त पोहोचलो. त्यांना प्रकाशचित्रं खूपच भावली. या त्यांच्या रंगीत व कृष्ण-धवल प्रकाशचित्रातून त्यांनी अनेक प्रकाशचित्रं निवडली. पुढे प्रत्येक वेळी कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी ती प्रकाशचित्रं वापरात येऊ लागली. त्यांच्यासारख्या ‘परफेक्शनिस्ट’ कलाकाराने मी टिपलेल्या प्रकाशचित्रांचा असा वापर करणं हीच माझ्यासाठी मोठी पावती होती.

त्यांच्याकडच्या प्रकाशचित्रांच्या प्रती संपत आल्या, की त्या मला फोन करीत. त्यावर नंबर टाकलेले असल्याने फक्त प्रत्येकाच्या किती प्रती हव्या एवढाच प्रश्न असे. प्रिंट्स तयार झाल्यावर मी डेक्कन जिमखान्यावरील ‘नृत्यभारती’च्या क्लासवर जात असे. तेथे ‘नृत्य-यज्ञ’ सतत फुललेलाच असे. कधी बेबीताई भेटत, तर कधी त्या नसत. अशा वेळी मी प्रिंट्स तेथे ठेवून येत असे. लगेचच संध्याकाळी त्यांचा फोन ठरलेला. ‘ तुम्ही येऊन गेलात. मी नव्हते. मी तुमचे पैसे काढून ठेवले आहेत. कधी येताय न्यायला?’ आणि मी तेथे जाऊन ते पैसे घेईपर्यंत जर उशीर झाला तर त्यांचा परत फोन ठरलेला. व्यवहाराबाबत कायमच चोख असलेल्या अशा कलाकार व्यक्ती विरळच!

बेबीताईंचा माझ्या कामावर विश्वास आहे हे कळल्यामुळे काय होऊ शकतं याचा एक अनुभव मला आला. त्यांच्याच एका ज्येष्ठ शिष्येचा फोटोसेशन मी करीत होतो. बेबीताई बाहेरगावी गेल्या असल्याने त्यांची दुसरी शिष्या शरीरमुद्रा व भाव अचूक करण्यासाठी आली होती. दरम्यान ज्यांचा फोटोसेशन मी करीत होतो, त्यांनी मला प्रिंट्स त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणून देण्यास सांगितलं. मी कसलं हॉस्पिटल आहे याची चौकशी केल्यावर कळलं, की ते डोळ्यांचं हॉस्पिटल आहे. त्यांचे यजमान हे पुण्यातील अतिशय नामवंत असे नेत्रतज्ज्ञ. मला आय-प्रेशरचा त्रास होतो असे मी सांगताच त्या म्हणाल्या, ‘मी तुमच्यासाठी वेळ घेऊन ठेवते; पण आमच्या इथे भरपूर वेळ लागतो. त्यामुळे वेळ ठेवून या.’ मी हॉस्पिटलमध्ये गेलो. भरपूर गर्दी. माझे नाव टाकून एक कार्ड बनवले गेले. आधी दोन ज्युनिअर डॉक्टर तपासणार. मग सर्वांत शेवटी मोठ्या सरांकडे रवानगी. सरांचा दरारा मोठा. ते एकदम कमी बोलतात असं मी ऐकलेलं. मी त्यांच्या केबिनमध्ये पोहोचलो. डोळे तपासणीच्या अत्याधुनिक यंत्रासमोर बसलो. कार्डावर माझं नाव बघून पलीकडच्या आयपीसला स्वतःचा डोळा लावत सर म्हणाले, ‘बेबीताई नेहमी तुमचं खूप कौतुक करीत असतात. ही मोठी गोष्ट आहे.’ मला आधी कळेच ना, की ते कुणाशी बोलत आहेत. मग मी भानावर आलो. डॉक्टरांनी मग मला आयड्रॉप्स लिहून दिले. माझ्या कार्डावर त्यांनी मार्कर पेनने एक तिरकी रेघ मारली. मी बाहेर आलो. बिलिंग काउंटरवर गेलो. तेथील मुलीने कार्डावरील ती रेघ पाहून मला ‘आता तुम्ही जाऊ शकता’ असं सांगितलं. मी फी विचारल्यावर तिने त्या तिरप्या रेघेचा खुलासा केला, की ही रेघ म्हणजे तुमच्याकडून काही फी घ्यायची नाहीये. मी विस्मयचकित.

संगीताचे कार्यक्रम, नृत्यभारतीचे कार्यक्रम, वर्कशॉप्स यातून बेबीताई नेहमी भेटत राहिल्या. प्रत्येक भेटीत त्यांचा स्निग्ध स्वभाव अनुभवत गेलो. २००५ सालच्या ‘आनंदयात्री पु. ल.’ या माझ्या कॅलेंडरचं प्रकाशन ‘पुलं’च्या जन्मदिनी बेबीताईंच्या व कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते झालं. त्या वेळी त्या ८१ वर्षांच्या होत्या; पण त्यांचं ते देखणेपण, तो डौल, ती सजगता मी प्रदर्शनात, पहिल्या भेटीत अनुभवली तशीच होती.

‘जाणिजे यज्ञकर्म’ हे ब्रीदवाक्य असलेली ‘नृत्यभारती’ व ‘कथक’ हेच जीवन जगलेल्या या कलावतीबद्दल तिच्याच शब्दात सांगायचं झालं, तर - ‘नृत्यकला अशी तरल! तिच्या रंगमंचावरच्या त्या नित्य नव्या निर्मितीप्रक्रियेची किमया प्रत्यक्ष अनुभवताना मला कित्येकदा भास होतात... नृत्य करता करताच मन त्रयस्थ होत जातं नि म्हणतं, ‘ तुझा हा थिरकता देह मी नव्हे. तुझ्या नृत्याविष्काराचं साधनही नव्हे मी – ना माध्यम! मी आहे प्रत्यक्ष नृत्याविष्कार. नृत्याचा दृष्य आशय. आशयाची सुभग प्रतीती. आशयाचं संपूर्ण निःस्वार्थी भान आहे मी!’

- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZWLGCR
Similar Posts
स्वर-भावगंधर्व २६ ऑक्टोबर हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख...
स्वरसम्राज्ञी २८ सप्टेंबर हा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख...
शहंशाह-ए-गज़ल गज़लसम्राट मेहदी हसन यांचा १८ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने, प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा लेख प्रसिद्ध करत आहोत.
‘रसराज’ पंडित जसराज तसं म्हटलं तर शेवटच्या श्वासापर्यंत गात होते. ८९व्या वर्षी ‘सवाई’ त गायले. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी अमेरिकेतील न्यू जर्सी येथील त्यांच्या घरी पोहोचले. मग सारं जग ‘करोना’मय झालं. तरी यांचं ऑनलाइन शिकवणं सुरूच होतं. १७ ऑगस्ट २०२०ला त्यांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला. ‘जसराज’ नावाचं एक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language